Tuesday, August 19, 2008

विसापूर

प्रकार : गिरिदुर्ग

उंची : 1090 मी / 3577 फूट

जिल्हा : पुणे

तालूका : मावळ

उपनाम : पाटण

श्रेणी : मध्यम

लोहगडाच्या पूर्वेस विसापूर हा किल्ला आहे. आकारमानाने तो लोहगडापेक्षा मोठा आहे. मावळ व लोणावळा घाटाच्या रक्षणासाठी या किल्ल्याची निर्मित करण्यात आली होती.

इतिहास :

विसापूरच्या जोडीला असलेल्या लोहगडावर बर्‍याच काही ऐतिहासिक घटना घडल्या मात्र विसापूरवर महत्वाच्या घटना घडल्याचे इतिहास नोंदी नाहीत. 4 मार्च 1818 साली जनरल प्रॉथर प्रथम लोहगड जिंकण्यसाठी आली त्याने विसापूर जिंकून घेतले. विसापूरहून लोहगड तोफांच्या टप्प्यात आरामात येत असल्यामुळे मराठ्यांना लोहगड फार काळ टिकवता आला नाही.

पाहण्यासारखी ठिकाणे :

हनुमानाची मुर्ती, पाण्याची तळी, गुहा, गडावरील लांबलचक पठारे, दारूगोळा कोठार

राहण्याची सोय :

पावसाळ्यात राहण्याची सोय नाही मात्र इतर हंगामात या गडावर राहण्याची सोय होऊ शकते.

पाण्याची सोय :

किल्ल्यावर 12 ‍महिने पिण्याचे पाण्याची मुबलक सोय.

जेवणाची सोय :

नाही

जाण्याच्या वाटा :

पुण्याहुन लोणावळ्याकडे जाणार्‍या लोकलमध्ये बसल्यावर लोणावळ्याच्या आधी मळवली हे रेल्वे स्थानक आहे. येथे उतरून विसापूरला जाता येते. वाटेत भाजे लेणी पाहण्यासारखी आहेत.

शिवनेरी


प्रकार : गिरिदुर्ग

उंची : 1100 मी / 3500 फूट

जिल्हा : पुणे

तालूका : जुन्नर

उपनाम : -

श्रेणी : सोपी

छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या किल्लावर झाला तो किल्ला म्हणजे किल्ले शिवनेरी. या किल्ल्यावर राज्यांचा जन्म झाल्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.

इतिहास

इ.स. 1170 ते 1308 च्या काळात यादवांनी येथे आपले राज्य निर्माण केले त्यांनीच या किल्ल्याची निर्मिती केली. इ. स. 1443 मध्ये मलिक –उल-तुजार याने यादवांचा पराभव करून हा किल्ला हस्तगत केला. त्यानंतर या किल्ल्यावर निजामशाहीचे राज्य आले. 1595 च्या काळात हा किल्ला भोसले राज्यांकडे आला. फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जिजाऊंच्या पोटी शिवाजी राजे जन्माला आले. या गडावर शिवाई नावाजी देवी होती तिला जिजामातेने नवस बोलला होता त्यामुळे मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.

इ. स. 1637 मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. शिवाजीने हा किल्ला परत मिळवण्यासाठी दोन तीन वेळा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी 1716 मध्ये शाहूमहाराजांनी हा किल्ला मराठांच्या ताब्यात आणला.

पाहण्यासारखी ठिकाणे :

गंगा टाकी, जमुना टाकी, शिवाई मंदीर, दरवाजे, अंबरखाना, शिवजन्मस्थान, जिजाऊ व बाल शिवाजी यांचा पुतळा, बदामी टाक इ पाहण्यासारखे आहे.

राहण्याची सोय :

शिवकुंजच्या मागिल बाजूस वर्‍हांड्यात 10 ते 15 जणांची सोय होऊ शकते.

पाण्याची सोय :

गंगा जमुना टाक्यांमध्ये 12 माही पिण्याचे पाणी उपलब्ध

जेवणाची सोय :

आपण स्वत: करावी

जाण्याच्या वाटा :

गडाच्या वरपर्यंत गाडी जाते. तसेच सातवाहनकालीन खोदीव दगडी पायर्‍यांचा मार्ग आहे. साखळीच्या मार्गे सुध्दा रस्ता आहे.

लोहगड


प्रकार : गिरिदुर्ग

उंची : 1090 मी / 3412 फूट

जिल्हा : पुणे

तालूका : मावळ

उपनाम : -

श्रेणी : सोपी

किल्ले लोहगड नावाप्रमाणे अतिशय मजबूत बुलंद व पोलादी ‍गड आहे. मावळ व लोणावळ्यातील भागातील संरक्षण करण्यासाठी लोहगड व विसापूर बांधण्यात आला होता. लोणावण्यापासून जवळ असल्यामुळे तसेच भाजे व बेडसे लेणी असल्यामुळे येथे दुर्गप्रेमींची वर्दळ असते.

इतिहास :

या किल्ल्याचा इतिहास तसा 2500 वर्षांपूर्वीचा आहे. सातवाहन चालुक्य, राष्ट्रकूट यादव अशा सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या आहेत. इ. स. 1490 च्या काळात निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदने पुण्याच्या आजूबाजूचे अनेक किल्ले जिंकले त्यात या ही किल्ल्याचा समावेश आहे. इ.स.1635 मध्ये हा किल्ला आदिलशाहीत आला. इ. स. 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. पुढे 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला व त्यात जे काही 23 किल्ले मोगलांना गेले त्यात याही किल्ल्याचा समावेश होता. पण पाचच वर्षांनी म्हणजे 1670 च्या काळात मराठ्यांनी या किल्ल्यावर भगवा फडकवला. पहिल्या सुरत लुटीतील सर्व धन प्रतिशिवाजी नेताजी पालकर यांनी याच किल्ल्यावर आणून ठेवली होती. शिवाजी महाराज्यांच्या मृत्यू नंतर हा किल्ला परत मोगलांकडे गेला. मात्र कान्होजी आंग्रे यांनी 1713 मध्ये हा किल्लावर मराठ्यांचे छत्र आणले. इ.स. 1720 मध्ये तो पेशव्यांकडे आला. 1770 मध्ये नाना फडणवीसांचे सरदार जावजी बोंबले यांच्या ताब्यात आला. 1803 मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला. पर लगेत दुसर्‍या बाजीराव पेशव्याने तो किल्ला जिंकला. पण पुढे 1818 मध्ये हा किल्ला जिंकण्यासाठी जनरल प्रॉथर आला त्याने प्रथम विसापूर जिंकला व त्याच्या दुसर्‍याच दिवशी लोहगड पडला.

पाहण्यासारखी ठिकाणे :

गडावर चढताना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. त्या मार्गाने गेल्यावर गणेश दरवाजा नारायण दरवाजा हनुमान दरवाजा व महादरवाजा लागतात. नारायण दरवाज्यापाशी दोन भूयार आहेत तेथे पुर्वी भात व नाचणी साठवले जात होती. गडावर दोन तोफाही आहेत. शिवमंदिर भग्नावस्थेत आहे.

राहण्याची सोय :

या गडावर राहण्याची सोय होऊ शकते.

पाण्याची सोय :

किल्ल्यावर 12 ‍महिने पिण्याचे पाण्याची मुबलक सोय.

जेवणाची सोय :

नाही

जाण्याच्या वाटा :

पुण्याहुन लोणावळ्याकडे जाणार्‍या लोकलमध्ये बसल्यावर लोणावळ्याच्या आधी मळवली हे रेल्वे स्थानक आहे. येथे उतरून लोहगडवाडीला जाता येते. तेथून किल्यावर जायला वाट आहे. वाटेत भाजे काले व बेडसाची लेणी पाहण्यासारखी आहेत.

जीवधन


प्रकार : गिरिदुर्ग

उंची : 1045 मी / 3700 फूट

जिल्हा : पुणे

तालूका : जुन्नर

उपनाम : -

श्रेणी : क‍ठीण

जुन्नरच्या नाणेघाटच्या डोंगरात वसलेल्या दुर्ग चौकडीतील जीवधन हा एक किल्ला. या भागातील शिवनेरी हा किल्ला सर्व परिचित आहे मात्र जीवधन, हडसर, चावंड हे मात्र अनेक जणांना माहित नाहीत. जुन्नरच्या पश्चिमेला 30 ते 32 कि. मी. वर हा किल्ला आहे.

इतिहास :

सातवाहनकाळात या गडाची निर्मिती झाली आहे. नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी ह्या किल्ल्याची निर्मिती केली होती. इ.स. 1485 च्या काळात अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदने हा किल्ला जिंकून घेतला होता.

इ. स. 1664 च्या सुमारास निजामशाहीचा शेवटचा वंशज मूतिजा निजाम याला जीवधनच्या किल्ल्यावर कैद केले होते. शहाजीराज्यांनी या किल्ल्यावर आक्रमण करून त्याला या कैदेतून मुक्त केले.

1818 च्या काळात इतर किल्ल्यांप्रमाणे इंग्रजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

पाहण्यासारखी ठिकाणे :

गजलक्ष्मीचे ‍शिल्प, पाण्याचे टाके, जीवाईदेवीचे मंदिर, धांन्याची कोठार इ. प्रेक्षणीय आहे. या किल्ल्यावरून कोकणाचे विहंगम दृष्य दिसते.

राहण्याची सोय :

नाही

पाण्याची सोय :

किल्ल्यावर 12 ‍महिने पिण्याचे पाणी उपलब्ध.

जेवणाची सोय :

नाही,

जाण्याच्या वाटा :

पुण्याहून जुन्नरला राज्य परिवहन मंडळाची बस जाते. घाटघर मार्गापर्यंत ‍जीपने जाता येते. तेथून पायवाटेने किल्ल्यावर जाता येते. गडावर जाण्यासाठी पूर्वेकडून व पश्चिमेकडून असे दोन मार्ग आहेत.

चावंड

प्रकार : गिरिदुर्ग

उंची : 1065 मी / 3400 फूट

जिल्हा : पुणे

तालूका : जुन्नर

उपनाम : प्रसन्नगड, जुंड

श्रेणी : मध्यम

जुन्नरच्या नाणेघाटच्या डोंगरात वसलेल्या दुर्ग चौकडीतील चावंड हा एक किल्ला. शिवाजी महाराजांनी या गडाचा नाव प्रसन्नगड असे ठेवले होते. या भागात शिवनेरी हा किल्ला सर्व परिचित आहे मात्र चावंड जीवधन हडसर हे मात्र अनेक जणांना माहित नाहीत. मात्र इतिहासात या किल्ल्यांनी फार महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या.

इतिहास :

इ. स. 1485 च्या काळात निजामशाहीच्या मलिक अहमदने हा किल्ला हस्तगड केला. दुसरा बुर्‍हाण निजामशाहा हा सातवा निजाम याचा नातू बहादुरशाहला 1594 साली चावंडगडावर कैद केले होते. 1663 मध्ये शहाजीराज्यांनी हा गड मोगलांना तहात दिला. पुढे मर्द मराठ्यांनी या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवला. पुढे महाराज्यांच्या मृत्यूनंतर मलिक अहमदने हा किल्ला परत मोगलांच्या ताब्यात आणला व एका सरदाराच्या ताब्यात किल्ल्याचा ताबा दिला. पुढे इंग्रजानी हा किल्ला हस्तगत करण्यासाठी तोफांचा भयंकर मारा केला व त्यात या किल्ल्याची खूप पडझड झाली. व हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला.

पाहण्यासारखी ठिकाणे :

किल्ल्याचे प्रवेशद्वार, श्री चावंडाबाईची मुर्ती, दीपमाळ कुंड गुडा, मंदीरांचे अवशेष इत्यादी.

राहण्याची सोय :

किल्ल्यांवरील कोठारात साधारणपणे 20 जण राहू शकतात पण पायथ्याशी असलेल्या चावंड गावात राहण्याची चांगली सोय होऊ शकते.

पाण्याची सोय :

पाण्याची सोय 12 महिने उपलब्ध आहे.

जेवणाची सोय :

गडावर जेवणाची सोय नाही मात्र चावंड गावात जेवणाची सोय होऊ शकते.

जाण्याच्या वाटा :

पुण्याहून जुन्नरला सारख्या राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या आहेत. जुन्नरहून चावंड हे साधारणपणे 15 ते 20 कि. मी. इतके आहे. जुन्नरहून ‍जीपने आपटाळे व तेथून परत जीपने चावंड गावात जाता येते. चावंडवाडीतून गडावर जाता येते या वाटेने गड चढायला साधारणपणे 1 तास लागतो.

हडसर

प्रकार : गिरिदुर्ग

उंची : 1025 मी / 3200 फूट

जिल्हा : पुणे

तालूका : जुन्नर

उपनाम : - पर्वतगड

श्रेणी : मध्यम

जुन्नरच्या नाणेघाटच्या डोंगरात वसलेल्या दुर्ग चौकडीतील हडसर हा एक किल्ला. पर्वतगड म्हणूनही हा किल्ला ओळखला जातो. या भागातील शिवनेरी हा किल्ला सर्व परिचित आहे मात्र हडसर, चावंड, जीवधन हे मात्र अनेक जणांना माहित नाहीत. जुन्नरपासून 10 ते 12 कि. मी. वर हा किल्ला आहे.

इतिहास :

सातवाहनकाळात या गडाची निर्मिती झाली आहे. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नरगच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला होता. या किल्ल्याचा इतिहासात फारसा उल्लेख नाही. शहाजीराज्यांनी मोगलांनी केलेल्या तहात जे किल्ले गेले त्यात या किल्ल्याचा समावेश होता.

1818 च्या काळात इतर किल्ल्यांप्रमाणे इंग्रजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. या किल्ल्यापासून पुढे धोका निर्माण होऊ नये म्हणून ‍इंग्रजांनी या किल्ल्यावर जाणार्‍या वाटा सुरूंग लावून फोडल्या होत्या. आता मात्र या किल्यावर सहज जाता येते.

पाहण्यासारखी ठिकाणे :

किल्ल्यावर जाण्यासाठी 300 पायर्‍या आहेत. या किल्याचे प्रवेशद्वार म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. त्यामुळे जे दुर्गवेडे आहेत त्यानी हा किल्ला पाहिलाच पाहिजे. कोरीव गुहा महादेवाचे मंदिर, तीन प्रशस्त कोठारे

राहण्याची सोय :

नाही, हडसर गावात मात्र होऊ शकते.

पाण्याची सोय :

किल्ल्यावर 12 ‍महिने पिण्याचे पाणी उपलब्ध.

जेवणाची सोय :

नाही, हडसर गावात मात्र होऊ शकते.

जाण्याच्या वाटा :

पुण्याहून जुन्नरला राज्य परिवहन मंडळाची बस जाते. तेथून हडसरपर्यंत जीपने जाता येते हडसरहुन किल्ल्यावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत.

सिंहगड


प्रकार : गिरिदुर्ग

उंची : 1310 मी / 4400 फूट

जिल्हा : पुणे

तालूका : हवेली

उपनाम : कोंढाणा

श्रेणी : सोपी

पुण्याच्या नैत्रत्येला अंदाजे 30 कि. मी अंतरावर असलेला, सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या पर्वत रांगांमध्ये सिंडगड उभा आहे. दूरदर्शनच्या दोन उंच मनोर्‍यांमुळे सिंहगड कोठूनही पटकन ओळखता येतो. हा किल्ला पुण्यापासून जवळ असल्यामुळे व गडाच्या वरपर्यंत गाडी जात असल्यामुळे किल्यावर 12 महिने गर्दी असते.

इतिहास

हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. त्यावेळी दादोजी कोंडदेव हे या किल्ल्याचे सुभेदार होते. त्यांच्या निधनानंतर म्हणजे इ. स. 1647 मध्ये शिवरायांनी हा किल्ला हस्तगत केला. मात्र पुरंदरच्या तहात महाराजांना हा किल्ला परत मोगलांना द्यावा लागला. मोगलांनी या किल्लावर उदयभान हा रचपूत किल्लेदार नेमला. कोढाणा आपल्या हातून गेल्याची सल शिवरायांना लागून होती. ती त्यांनी तानाजी मालूसरेला बोलवून दाखवली तेव्हा त्याने आपल्या मुलाचे लग्न बाजूला ठेऊन या किल्ल्यावर भगवा फडकवायचे वचन दिले. माघ वद्य नवमीच्या रात्री म्हणजेच दि. 04 फेब्रुवारी 1672 मध्ये या किल्लावर मोगलांचे व मावळ्यांचे घनघोर युध्द झाले. त्यात मावळ्यांचा विजय झाला. माझ तानाजीला आपले प्राण गमवावे लागले. ही बातमी जेव्हा शिवाजी राज्यांना कळाली तेव्हा ते म्हणाले की ‘गड आला पण सिंह गेला’ त्या दिवसापासून या किल्ल्याला सिंहगड हे नाव पडले.

दि. 03 मार्च 1700 रोजी सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराजांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर 14 एप्रिल 1703 मध्ये मोगलांनी हा किल्ला जिंकला. तेव्हा औरंगजेब स्वता: हा किल्ला पहायला आला होता. पुढे 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

इ. स. 1890 च्या काळात असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांनी येथे बंगला बांधला ते येथे हवापालट करण्यासाठी येत. 1915 साली टिळक व महात्मा गांधीजींची भेट याच बंगल्यावर झाली.

सिंहगडावर गेल्यावर पीठल भाकर गरमागरम भजी मडक्यातील दही जर खाल्ले नाही तर ते आपले सर्वात मोठे दुर्दव समजावे. हे खाण्यासाठी अनेकजण सिंहगडावर जात असतात.

पाहण्यासारखी ठिकाणे :

दारूचे कोठार, देवटाके, राजाराम स्मारक, तानाजीचे स्मारक, तानाजी कडा, गणेश मंदिर, श्री अमृतेश्वर भैरव मंदिर कोंडाणेश्वर मंदिर, उदयभानाचे थडगे.

राहण्याची सोय :

नाही

पाण्याची सोय :

12 महिने देवटाकीचे पाणी उपलब्ध

जेवणाची सोय :

येथे हॉटेल्स भरपूर आहेत.

जाण्याच्या वाटा :

सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत पुणे परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) ची बस जाते. तेथून पायवाटेने गडावर जाता येते त्याला अंदाजे दीड ते दोन तास लागतात. तसेच आपले वाहन असेल तर गडावरही गाडीने जाऊ शकतो. अनेक ट्रेकर्स कात्रज- सिंहगड असा ट्रेक करतात.