Tuesday, August 19, 2008

वज्रगड

प्रकार : गिरिदुर्ग

उंची : 700 मी / 4590 फूट

जिल्हा : पुणे

तालूका : पुरंदर

उपनाम : रूद्रमाळ

श्रेणी : मध्यम

हा पुरंदरचाच जरी जोडकिल्ला असला तरी तो वेगळा होता. पुरंदरच्या मानाने हा किल्ला लहान होता मात्र हा जर किल्ला शत्रूच्या ताब्यात आला तर पुरंदर सहज ताब्यात येत होता त्यामुळे या किल्लाचे महत्व फार होते.

इतिहास

या किल्लाचा इतिहास आज दुर्दवाने उपलब्ध नाही मात्र इ. स. 1665 मध्ये जयसिंगाने जेव्हा पुरंदरला वेढा दिला तेव्हा अनेक प्रयत्न करून त्यांना पुरंदर घेता येत नव्हता तेव्हा त्यांच्या ध्यानी आले की वज्रगड घेतल्याशिवाय पुरंदर घेता येणार नाही. तेव्हा त्यांनी आपला मोर्चा वज्रगडावर वळविला व अनेक प्रयत्नानंतर वज्रगड त्यांच्या हाती आला. व त्यानंतर पुरंदरही सहज ताब्यात आला.

हा किल्ला अर्धा दिवसात पाहून होतो.

पाहण्यासारखी ठिकाणे :

या किल्ल्याची तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. तसेच प्रवेशद्वार पाण्याची टाके

राहण्याची सोय :

जोडकिल्ला पुरंदरवर राहण्याची सोय होऊ शकते.

पाण्याची सोय :

किल्यावर 12 माहि पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

जेवणाची सोय :

पुरंदरवर दोन तीन हॉटेल्स आहेत त्यात जेवणाची सोय होऊ शकते.

जाण्याच्या वाटा :

किल्याच्या वरपर्यंत गाडीने जाता येते तसेच पायवाटेनेही जाता येते. एस. टी. ने सासवड पर्यंत गाडी आहे तेथून किल्यावर जाता येते.

पुरंदर

प्रकार : गिरिदुर्ग

उंची : 1400 मी / 4590 फूट

जिल्हा : पुणे

तालूका : पुरंदर

उपनाम : -

श्रेणी : सोपी

छत्रपती संभाजी महाराज्यांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो किल्ला म्हणजे पुरंदर. याच किल्लयावर दि. 11 जून 1665 मध्ये जयसिंगांशी तह झाला त्याला पुरंदरचा तह म्हणून ओळखले जात. या तहात राज्यांना 23 किल्ले द्यावे लागले होते. हा किल्ला पुण्यापासून साधारणपणे 40 कि. मी. अंतरावर आहे. वज्रगड हा पुरंदरचा जोडकिल्ला. पुरंदर म्हणजे इंद्र ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य आहे त्याप्रमाणे हा किल्ला.

इतिहास

पुराणात या ज्या डोंगरावर पुरंदर आहे त्या डोंगराला इंद्रनील पर्वत म्हंटले जात होते. असे म्हणतात की हनुमान द्रोणगिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग येथे पडला व त्या भागातून हा डोंगर तयार झाला. इ. स. 1489 च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहंमद याने या किल्ल्यावर ताबा मिळवला. त्यानंतर इ. स. 1550 मध्ये तो आदिलशाहीत आला. त्यांनी तो महादजी निळकंठ यांच्याकडे सोपवला पण त्यांच्यात भावकीत भांडणे होते त्याचा फायदा घेऊन शिवाजी राज्यांनी हा किल्ला मिळवला.

आदिलशहाने फत्तेखानास शिवाजीचा बंदोवस्त करण्यासाठी पाठवले तेव्हा महाराज्यांनी या किल्ल्यावरून फत्तेखानाशी लढाई केली व त्यात यश संपादन केले. वैशाख शु 12 शके 1579 म्हणजेच 16 मे 1657 साली संभाजी महाराज्यांचा जन्म याच किल्लयावर झाला. इ.स. 1665 मध्ये मोगलांचे सरदार जयसिंगांनी पुरंदराला वेढा दिला. तेव्हा मुरारबाजी देशपांडे आणि जयसिंगांचे घनघोर युध्द झाले. मुरारबाजी अतिशय शौर्याने लढला मात्र जयसिंगांच्या अफाट फौजेपुढे त्याला आपले प्राण गमवावे लागले. मुरारबाजी जेव्हा रणांगणात पडला तेव्हा शिवाजी राज्यांनी जयसिंगांशी तहाचे बोलणे केले व यातून परंदरचा तह झाला. मात्र पाचच वर्षांनी म्हणजे 1670 मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ल्यावर भगवा फडकवला. मात्र संभाजी राज्यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने हा किल्ला परत आपल्या ताब्यात घेतला. आणि त्याला आजमगड असे नाव ‍ठेवले. पुढे 1795 मध्ये छत्रपती शाहू महाराज्यांनी हा किल्ला पेशव्यांना दिला. या किल्ल्यावरच सवाई माधवराव पेशवे यांचा जन्म झाला.

स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे हा किल्ला लष्कराच्या ताब्यात होता आता तेव्हा परवानगी घेऊनचा किल्ला पाहता येत होता आता मात्र हा किल्ला सर्वांसाठी 24 तास खुला आहे.

पाहण्यासारखी ठिकाणे :

बनी दरवाजा रामेश्वर मंदिर खंदकडा पुरंदरेश्वर मंदिर दिल्ली दरवाजा केदारेश्वर पुरंदर माची भैरवखिंड तसेच वीर मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा इ. प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.

राहण्याची सोय :

येथे अनेक पडक्या वास्तू आहेत त्यात राहण्याची सोय होऊ शकते पावसाळा सोडून

पाण्याची सोय :

किल्यावर 12 माहि पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

जेवणाची सोय :

किल्ल्यावर दोन तीन हॉटेल्स आहेत त्यात राहण्याची सोय होऊ शकते.

जाण्याच्या वाटा :

किल्याच्या वरपर्यंत गाडीने जाता येते तसेच पायवाटेनेही जाता येते. एस. टी. ने सासवड पर्यंत गाडी आहे तेथून किल्यावर जाता येते.

तोरणा

प्रकार : गिरिदुर्ग

उंची : 1403 मी / 4604 फूट

जिल्हा : पुणे

तालूका : वेल्हा

उपनाम : प्रचंडगड

जाण्याचा रस्ता : मध्यम कठीण

शिवाजी महाराजांनी सुरूवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यातील तोरणा हा एक किल्ला. या गडावर तोरणा जातीची ख़ूप झाडे असल्यामुळे या गडाला तोरणा हे नाव पडले. शिवरायांनी जेव्हा या गडाची पहाणी केली तेव्हा त्यांना हा किल्ला प्रचंड दिसला म्हणून त्यांनी या किल्याला प्रचंडगड हे नाव दिले. तोरणा हा ‍पुणे जिल्हा‍तील सर्वाधिक उंचीचा किल्ला आहे.

इतिहास

हा किल्ला कोणी व कधी बांधला याचे पुरावे दुर्दवाने आज उपलब्ध नाहीत. इ. स. 1470 ते 1486 च्या काळात बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. त्यानंतरच्या काळात हा किल्ला निजामशाहीत गेला. इ. स. 1647 मध्ये शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी हा किल्ला स्वराज्यात सामावून घेतला. आपल्या हाती आल्यावर महाराजांनी हा किल्ला आणखी मजबूत करण्यास घेतला. तेव्हा कामगारांना एका ठिकाणी खणताना 22 हंडे सोन्याच्या मोहरा सापडल्या. त्यातील 5 हजार होन इतका खर्च त्यांनी या किल्लावर केला. पुरंदरच्या तहाच्या वेळी महाराज्यांनी आपल्या संभाषण कौशल्याने हा किल्ला खासकरून आपल्याकडेच राखून ठेवला.

पुढे संभाजी महाराज्यांच्या निधनानंतर इ. स. 1704 मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकला. औरंगजेबाने लढाई करून जिंकून घेतलेला हा एकमेव किल्ला आहे. तेव्हा औरंगजेबाने या किल्याचे नाव ‘फुतुउल्गैब’ म्हणजे ‘दैवि विजय’ असे ठेवले. त्यानंतर चारच वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर भगवा फडकवला. यानंतर तोरणा कायम स्वराज्यात राहीला.

पाहण्यासारखी ठिकाणे :

पुणे जिल्हातील सर्वात उंच व विस्ताराने मोठा किल्ला असल्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी दीड दिवस लागतो. बिनीचा दरवाजा, कोकण दरवाचा, तोरणाजाई व मेंगाई मंदिर, झुंजारमल माची, हनुमान बुरूज, बुधला माजी, माळेचा बुरूज इ. प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. किल्ल्यावरून राजगड सिंहगड किल्ले दिसतात.

राहण्याची सोय :

मेंगाई देवीच्या मंदीरात साधारपणे 50 जणांची राहण्याची सोय होऊ शकते. तसेच शासनातर्फे गडावर पर्यटन निवासही बांधण्यात येत आहे.

पाण्याची सोय :

येथे 12 माही पाण्याचे टाके आहेत. मात्र उन्हाळ्यात पिण्याचे पाण्याची कमतरता असते.

जेवणाची सोय :

गडावर रखवालदार एक छोटेसे हॉटेल चालवतो. मात्र त्यात आपल्याला गरमागरम भजी व चहा मिळेल.

जाण्याच्या वाटा :

गडावर जाण्याच्या 3/4 वाटा आहेत. वेल्हा पर्यंत एस. टी. महामंडळाची पहिली बस सकाळी 6.30 वाजता स्वारगेटपासून सुटते. त्यानंतर दर एक तासाला बस आहे. वेल्ह्याहून पुण्याला यायला शेवटची बस संध्याकाळी 5.30 वाजता आहे. गडावर जायला एक वाट गावातून आहे तर दुसरी वाट गावाच्याच उजव्या बाजूला एक ओढा वाहतो तो ओलांडून गेल्यावर गडावर जाता येते. गडावर जायला अंदाजे 3 तास लागतात.

राजगड तोरणा अशीही एक वाट आहे पण या वाटेने तोरण्यावर पोहोचायला अंदाजे 6 तास लागतात.

****************

प्रस्तावना

महाराष्ट्राचे खरे वैभव म्हणजे सह्यादीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेले किल्ले. या किल्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली. हे दुर्गम व सागरी किल्लेच शिवरायांची खरी सेना होती. या किल्यांमुळे शिवाजीराज्यांनी चारही पातशाह्यांना झूंजवले.

महाराष्ट्रात आजमितीला 350 हून अधिक किल्ले आहेत. पण या समृध्द वैभवाकडे आपल्या सर्वांचेच दूर्लक्ष झाले आहे. इतिहासात एवढी महत्वाची भूमिका बजावणार्‍या या किल्यांवर आज फक्त पूरातत्व विभागाच्या एका निळ्यापाटी शिवाय काहीच नाही. अनेक किल्ले ढासळत चालले आहेत. अशीच परिस्थिती राहीली तर काही वर्षांनंतर तेथे या किल्यांचे अस्तित्वच राहणार नाही. पुढच्या पिढीला फक्त किल्यांच्या फोटोवर समाधान मानावे लागेल. काही मोजके किल्ले सोडले तर कित्येक किल्ले लोकांना माहितसूध्दा नाहीत हे आज आपले सर्वांत मोठे दुर्दव आहे.

आज किल्यांच्या बाबतीत माहिती गोळा करायची तर फार थोडया किल्यांबद्दल त्रोटक माहिती इंटरनेवर उपलब्ध आहे. यातूनच आम्हाला किल्यांवर एकादे स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करण्याची संकल्पना मनात आली. यात शक्य होईत तेवढ्या किल्यांची माहिती व छायाचित्रे देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. प्रत्येक किल्याचा इतिहास, त्यावर असलेली ऐतिहा‍सीक स्थळे, त्या किल्यावर जायचे कसे, तेथे राहण्याची, जेवणाची सोय आहे की नाही, अशी सर्व प्रकारची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

आमच्या या छोट्याश्या प्रयत्नातून जर कोणाच्या मनात किल्यांविषयी जनजागृती निर्माण झाली तर हे या संकेतस्थळाचे सर्वात मोठे यश असेल आपल्याला या संकेतस्थळाबद्दल काही प्रतिक्रीया वा सूचना असल्यास आम्हाला जरूर कळवा आम्ही त्याची वाट पहात आहोत.